पैठण : पैठण शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वडवाळी व गोपेवाडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी महिला व पुरुषांना चाकू, कोयता, लाकडी दांडा व काठ्यांनी बेदम मारहाण करून सुमारे नव्वद हजार सातशे पन्नास रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले.
दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत विठ्ठल देवराव पवार, सोनल शिवलाल गायकवाड, कुसूमबाई शिवलाल गायकवाड, सुमनबाई नवनाथ वेताळ हे जखमी झालेले आहेत. सुमनबाई वेताळ या महिलेच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची जखम झाल्यामुळे त्यांना पैठण येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. औरंगाबादच्या श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, या पथकातील श्वानाने डाव्या कालव्यापर्यंत माग काढला आहे. चोरटे डावा कालवा ओलांडून पसार झाले आहेत. याप्रकरणी सोनल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख हे तपास करीत आहेत